मुंबईत भरधाव कारने आठ जणांना चिरडले, चार ठार तर चार जण गंभीर

 क्रॉफर्ड मार्केट परिसरात सोमवारी रात्री झालेल्या भीषण कार अपघातात ४ जण ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले.  

Updated: Sep 1, 2020, 07:01 AM IST
मुंबईत भरधाव कारने आठ जणांना चिरडले, चार ठार तर चार जण गंभीर   title=
Pic Courtesy: ANI

मुंबई :   शहरातील क्रॉफर्ड मार्केट परिसरात सोमवारी रात्री झालेल्या भीषण कार अपघातात चार जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगात असलेली ही कार जनता कॅफेसमोरच्या फुटपाथवर चढली. या गाडीने एकूण आठ लोकांना चिरडले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले. जखमींना जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडीचे नियंत्रण सुटल्यावर गाडी क्रॉफड मार्केट परिसरातील जनता कॅफेला धडकली.

भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. ही कार थेट फूटपाथवर चढली. अपघाताचे वृत्त मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  समीर डिग्गी असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे.

डिग्गीवर तीन महिन्यांपूर्वीही जे.जे.मार्ग पोलिसांनी  भरधाव वेगात कार चालवून अपघातात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पुन्हा एकदा त्याने अपघात करत चार जणांना ठार केले आहे. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून यात तीन महिलांचा समावेश आहे. अन्य गंभीर जखमींवर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत.