देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: ना.म. जोशी मार्ग, नायगाव, वरळी इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या मार्गी लागत असल्याचे चित्र आहे खरे. पण, याच पुनर्विकासाच्या मुदद्याबाबत शिवडीतील बीडीडीवासीयांना चिंता सतावते आहे. रहिवाशांच्या चिंतेच काय कारण आहे? त्यांच काय म्हणण आहे? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
शिवडीत एकूण पाच एकर जागेत बारा बीडीडी चाळी, नऊशे साठ खोल्या. शंभरीकडे झुकलेल्या या बीडीडी चाळींची अवस्था आज दयनीय आहे. त्यामुळे म्हाडाकडून बीडीडी चाळींचा होत असलेला पुनर्विकास इथल्या रहिवाशांना हवा आहे. मात्र यात मुख्य अडसर आहे तो मुंबई पोर्ट ट्रस्टचा. कारण, या चाळी पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे ही जागा राज्य सरकारकडे जोपर्यंत हस्तांतरित होत नाही तोपर्यंत इथल्या पुनर्विकासाला चालना मिळणार नाही.
दरम्यान, शिवडी बीडीडीकरांच्या या प्रश्नी म्हाडाने जागा हस्तांरनासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पत्रव्यवहार केलाय. त्याच सोबत दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील याबद्दल पाठपुरावा केलाय. केंद्राच्या अखत्यारीतील हा प्रश्न आहे, राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यामुळे हा प्रश्न आणखी न रखडता तात्काळ सुटावा अशी अपेक्षा रहिवाशांना आहे.