Mumbai Crime : मुंबईच्या कुर्ला (Kurla Crime) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी मुंबईतील कुर्ला परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. अज्ञात सुटकेसची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर सुटकेस उघडून पाहिली असता त्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कुर्ला-सीएसटी रोडवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह एका बॅगेत पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक लोकांना रस्त्यावर एक बॅग पडलेली पाहिली आणि पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर कुर्ला पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख पटल्यानंतर पोलीस मारेकऱ्याला शोधून काढणार आहेत.
रविवारी कुर्ला पोलीस ठाण्यात दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान एक संशयीत बॅग आढळून आल्याची माहिती देण्यात आली होती. सी.एस टी.रोड येथील शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणीवरील बॅरेकेटच्या आतल्या बाजूला एक संशयित सुटकेस ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तिथे जाऊन सुटकेसची तपासणी केली असता त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आलं. पोलिसांनी महिलेचा मृतदेह राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.