मुंबई : दादरमधल्या (Dadar) मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क इथल्या जलतरण तलाव परिसरात (swimming Pool) मंगळवारी मगरीचे पिल्लू (crocodile) आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. अडीच फूट असलेले मगरीचं पिल्लू शेवजारच्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचा आरोप मनसेने केला होता. यानंतर वनविभागाने या प्राणीसंग्रहालयावर धाडही टाकली होती. मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी एक सीसीटीव्ही शेअर केलं असून, ही मगर शेजारच्या प्राणीसंग्रहालयातूनच आल्याचं सिद्ध केलं होतं.
ही घटना ताजी असतानाच आता प्राणिसंग्रहालयातून धामण जातीचा साप थेट स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दिसून आला. धामण आढळल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून साप पकडण्यात आला. त्यामुळे हे प्राणी संग्रहालय बंद करावं अशी मागणी होऊ लागली आहे.
मनसेने घेतला आक्षेप
या प्राणी संग्रहालयाविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'महात्मा गांधी जलतरण तलावामागे असलेल्या जागेत अनधिकृतरित्या प्राण्यांना ठेवलं जातं. तिथे अजिबात कारवाई केली जात नाही. हे अनधिकृत प्राणी संग्रहालय असून तरणतलावाच्या व्यवस्थापकांनी वारंवार त्यांची तक्रार केली आहे. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर नेमका कोणाचा राजकीय वरदहस्त आहे,' अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली होती. 'मुंबई महानगरपालिकेचे त्या व्यक्तीसोबत काय लागेबंध आहेत हे माहीत नाही. पण निश्चितच आहेत. कारण, महानगरपालिकेने त्या जागेसंबंधित केस कोर्टात जिंकली आहे. तरीही जागा ताब्यात का घेतली जात नाही. याप्रकरणी आयुक्त इक्बाल सिंग यांची भेट घेऊन ही जागा रिकामी करण्याची मागणी करणार आहे' असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.
जुलैमध्ये सापही आढळले
महात्मा गांधी जलतरण तलावात जून, जुलै अशा सलग दोन महिन्यांत दोन साप आढळून आले होते. त्यानंतर इथं पोहायला येणाऱ्या सभासदांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं. जलतरण तलावाच्या ठिकाणी साप येण्याच्या या वारंवारच्या घटनांमुळे याचा शोध महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. यावेळी हे साप बाजुच्या जागेमध्ये उभारण्यात आलेल्या प्राणिसंग्रहालयातील असावेत असे अंदाज बांधला वर्तविण्यात आला होता.