मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?

Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची....   

सायली पाटील | Updated: Oct 26, 2023, 07:57 AM IST
मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?  title=
Mumbai Local news western railways cancelled 2500 trains latest update

Mumbai Local News : मुंबईतून मोठ्या संख्येनं प्रवासी दर दिवशी लोकलनं प्रवास करत अपेक्षित ठिकाणी पोहोचतात. वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करणाऱ्या या शहरात मुंबई लोकल अनेकांसाठीच वरदान. पण, आता याच लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. कारण, शुक्रवारपासून (27 ऑक्टोबरपासून) रेल्वे प्रवासाच्या वेळांमध्ये मोठे बदल होणार असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर होणार आहे. पुढील 11 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्यामुळं नागरिकांनी प्रवासाचं पूर्वनियोजन करूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कारण, तब्बल 2525 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 

2500 हून अधिक रेल्वे रद्द... 

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 2500 हून अधिक लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेतल्यामुळं हा ब्लॉक असणार आहे. ज्याचा परिणाम विरार आणि चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप - डाऊन दिशेच्या अनेक लोकलसेवांवर होणार आहे. 

पश्चिम रेल्वेकडून बोरिवली आणि सांताक्रूझदरम्यान 2002 मध्ये आणि मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 1993 मध्ये पाचवी मार्गिका सुरु करण्यात आली होती. पण, जागेच्या कमतरतेमुळे, माहीम आणि सांताक्रूझ दरम्यानचा भाग मात्र पूर्ण झाला नाही. आता मात्र मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे मार्ग संपूर्ण वेगळे करण्यासाठी करण्यासाठी बोरिवली आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : भयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता 

 

परिणामस्वरुप पश्चिम रेल्वे मार्गावरील 2525 लोकल रद्द असतील. यापैकी सर्वाधिक लोकल रद्द होण्याचं प्रमाण 30 ऑक्टोबरला जास्त असेल. या वेळापत्रकानुसार बोरिवली/विरारकडे जाणाऱ्या 1271 आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या 1254 रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत. तर दैनंदिन स्वरुपात सुरु असणाऱ्या लोकलही सरासरी 15 ते 20 मिनिटं उशीराने धावतील. या कालावधीत लांब पल्ल्याच्या 43 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. इकतंच नव्हे तर, तब्बल 188 गाड्यांचा प्रवास मार्ग कमी करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या आणि तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांचा समावेश असेल.