Mumbai Local News: मुंबईत सलग सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांवर पाणी साचलंय. त्यात ट्रेन उशीराने धावतायत. कुठे इमारत कोसळतेय तर कोणी खड्ड्यात पडतोय. पावसाळ्यात आपल्या अनेक अजब गजब घटना पाहायला मिळतात. या दरम्यान एक विचित्र घटनेने काल आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चर्चगेट रेल्वे स्थानकातील ओव्हरहेड वायरवर रेनकोट अडकल्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. यामुळे लोकल ट्रेन 25 मिनिटे ठप्प होती. पोलिसांनी खूप मेहनत घेऊन बांबूच्या सहाय्याने रेनकोट काढला. पण रेनकोट तिथे कोणी फेकले? असा प्रश्न विचारला जात होता. तो रेनकोट फेकणारा आता पोलिसांच्या ताब्यात सापडलाय.
चर्चगेट स्थानकावर एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या आपल्या भिजणाऱ्या मैत्रिणीसाठी तो रेनकोट फेकलं होतं. पण हा रेनकोट ओव्हरहेड वायरमध्ये अशापद्धतीने अडकला की ट्रेनच खोळंबली आणि स्टेशनवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक तरुण ट्रेनची वाट पाहत होता. समोरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर त्याची मैत्रिण उभी होती. ती पावसात भिजताना त्याला दिसली. आपली मैत्रिण भिजू नये म्हणून ताकद लावून त्याने रेनकोट प्लॅटफॉर्म नंबर 3 च्या दिशेने भिरकावला. पण झालं भलतंच. रेनकोट प्लॅटफॉर्मच्या मधील रेल्वे लाईनच्या वर असलेल्या विजेच्या उघड्या तारेवर जाऊन अडकला. एकतर वीजेची खुली तार आणि त्यावर पाण्याने भिजलेला रेनकोट, यामुळे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पण कोणती दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन अलर्ट झाले.
@WesternRly के चर्चगेट स्टेशन पर जब रेनकोट ने रोक दी लोकल ट्रेन सेवाएं। दोपहर करीब ३ बजे की घटना। @rpfwr1 ने आरोपी को किया डिटेन।@News18India @RailMinIndia @drmbct @RPFCRBB @mumbairailusers @mumbaimatterz pic.twitter.com/YAqUjfuVtr
— Diwakar Singh (@Diwakar_singh31) July 22, 2024
रेल्वे लाइनचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आणि रेनकोट खाली उतरवण्यात आला. या सर्व गोंधळामुळे लोकल 25 मिनिटे उशिरा धावली. वीज पुरवठा नसल्याने ट्रेन आहे त्या जागीच थांबली होती. तसेच रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने पोलीस जमा झाले होते.
साधारण अर्ध्या तासानंतर लोकल पुन्हा सुरु करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.