ठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण, अनिल परब यांच्यासमोर झालेल्या मारहाणीचा Video समोर

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज मुंबई पालिका एच पूर्व विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

गणेश कवडे | Updated: Jun 26, 2023, 05:45 PM IST
ठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण, अनिल परब यांच्यासमोर झालेल्या मारहाणीचा Video समोर

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाने (SS Thackeray Group) आज मुंबई महापालिकेच्या (BMC) एच पूर्व वॉर्डवर मोर्चा काढला. अनिल परब यांच्या नेतृत्वात वांद्रे इथली ठाकरे गटाची शाखा तोडल्याप्रकरणीही ठाकरे गटाने मोर्चा काढला. यावेळी अनिल परब (Anil Parab) यांनी शिवसेना शाखेवरील कारवाईवरुन पालिका अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. अनिल परब पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्या पालिका अधिकाऱ्यांनी शाखेवर कारवाई  केली होती, त्या अधिकाऱ्यांना अनिल परब यांच्यासमोरच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काय आहे प्रकरण?
उद्धव ठाकर यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'पासून काही अंतरावरच असलेल्या ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. वांद्रेतील शिवसेनेची ही 44 वर्ष जुनी शाखा होती. शिवसेनेचं कार्यालय जमीनदोस्त केल्याने ठाकरे गट संतप्त झाला आहे.  शाखेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतानाही शाखेवर कारवाई केल्याने राग व्यक्त केला जात होता. याप्रकरणी निवदेन देण्यासाठी ठाकरे गट वॉर्ड ऑफिसला गेले होते. यासाठी ठाकरे गटाचं एक शिष्ठमंडळ वॉर्डात गेले यात अनिल परबही होते. पण शिष्ठमंडळातील काही पदाधिकाऱ्यांना राग अनावर झाला. 

शिष्ठमंडळ आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असताना अचानक पदाधिकाऱ्यांनी तोडक कारवाईत सहभागी झालेल्या अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. शाखेवर तोडक कारवाई केल्यानंतर ठाकरे गटाकडून पालिका अधिकाऱ्यांची भेट मागितली जात होती. पण त्यांना भेटही मिळत नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. 

अनिल परब यांचा सज्जड दम
वांद्रे इथल्या शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि शिवसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. तोडक कारवाई  करताना शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेबांचा फोटो बाहेर काढू द्या अशी मागणी ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांनी केली. पण त्यांच ऐकून न घेता पालिका अधिकाऱ्यांनी शाखेवर बुलडोझर फिरवला, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. शाखेला हात लावणारा तो पालिका अधिकारी कोण? त्या अधिकाऱ्यांचा काय बंदोबस्त करायचा तो आम्ही करु असा दम अनिल परब यांनी दिला. त्या अधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला उद्यापासून फिरवतो. कुठ-कुठ अनधिकृत बांधकाम आहे, हे त्या अधिकाऱ्याला दाखवतो. अधिकाऱ्याने ते अनधिकृत बांधकामही तोडावे. अन्यथा आम्ही तुम्हाला तोडू असा दमही अनिल परब यांनी दिला.

 

About the Author