मुंबई : मुंबईकरांसाठी 29 ऑगस्टचा मंगळवार पावसाचं विघ्न घेऊन आला. 26 जुलैची आठवण करून देणाऱ्या पावसात संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली बुडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. करोडो रूपये खर्च करून केलेली नालेसफाई आणि मुंबई तुंबणार नाही, हे सत्ताधाऱ्यांचे दावेदेखील या पावसात वाहून गेले.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सामान्य मुंबईकर कामावर निघाला तेव्हा दिवसभरात त्याच्यापुढं निसर्गानं काय वाढून ठेवलंय, याची कल्पनाच त्याला नव्हती. वेधशाळनं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. सकाळपासून पाऊसही बरसत होता. पण मुंबईला पाऊस काही नवा नाही... पण ११ नंतर पावसानं रौद्र रूप धारण केलं आणि या मुंबईच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल झाली.
दिवसभर मुंबईच्या कानाकोपऱ्यात पाऊस बरसतच होता. आता कामावरून घरी कसं परतायचं, या चिंतेनं मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. निसर्गानं अक्षरशः कहर केला होता... जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी तुंबलं होतं. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाड्या अडकून पडल्या होत्या. अनेकांनी आपल्या महागड्या गाड्या रस्त्यातच सोडल्या... बेस्ट आणि एसटीच्या बसेसही भर रस्त्यात बंद पडल्या. प्रवासी निघून गेले... पण चालक आणि वाहकांना अख्खी रात्र गाडीतच काढावी लागली. अनेक चाकरमानी आपापल्या ऑफिसातच अडकून पडले होते. शेकडो लोक रेल्वे स्थानकांवर गाड्या सुरू होण्याची वाट पाहत ताटकळत बसले...
अनेक मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत घर गाठता आलंच नाही, अशा अडकलेल्या मुंबईकरांसाठी विघ्नहर्ता गणपती बाप्पा धावून आला. प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरासह मुंबईतल्या अनेक गणेश मंडळांनी अडकलेल्यांना आसरा दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. चर्च आणि मशिदींचेही दरवाजेही सामान्य मुंबईकरांसाठी खुले झाले. अनेकांनी आपापल्या घराची दारंही अनोळखी पाहुण्यांसाठी खुली केली... मुंबईत माणूसकी शिल्लक नाही, असं हिणवणाऱ्यांना या शहरानं सणसणीत कानाखाली हाणल... पावसात अडकलेला... कोण, कुठला याची कसलीही विचारणा न करता शक्य तिथं, शक्य त्या मार्गानं मुंबईकरांनी त्यांना मदत केली.
याआधी 26 जुलै २००५ ला मुंबईनं असाच पावसाचा भयानक तडाखा सोसला होता. त्याचीच आठवण करून देणारा 29 ऑगस्टचा हा दिवस... मुंबईकरांचे पुन्हा एकदा तसेच हाल झाले... 12 वर्षांपूर्वी पालिकेत जे सत्ताधारी होते, तेच आताही सत्तेत आहेत. यावेळी राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. पण मुंबापुरीची तुंबापुरी व्हायचं काही टळत नाही... मुंबई अजूनही भगवान भरोसेच आहे, हेच खरं...