New College Under Mumbai University : मुंबई विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील कानकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या घराजवळ कॉलेज मिळणार आहे. याआधी ज्यांना मुंबई विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयांसाठी दूरवर यावे लागायचे, त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यासोबत विद्यार्थ्यांना पारंपारिक कॉलेजसोबत कौशल्य शिक्षण, अप्लायडचे शिक्षण घ्यायचेय त्यांच्यासाठीदेखील आनंदाची बातमी आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचा वार्षिक बृहत आराखडा नुकत्याच पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी एकूण 15 महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत.
ज्यामध्ये 13 कौशल्याधारीत, 1 उपयोजित आणि 1 पारंपारिक महाविद्यालयांचा समावेश आहे. ही सर्व प्रस्तावित नवीन महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर जिल्ह्यात निश्चित करण्यात आली आहेत.
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील दिवा, अडवली, ढोकळी, भिवंडी पडघा येथे 3; रायगड जिल्ह्यातील पेण वडखळ, रोहा नागोठणे, मुरूड रायगड येथे 3 महाविद्यालये असतील. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली नगरपंचायत क्षेत्र येथे 2; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वेंगुर्ला पारूले येथे 2 आणि पालघर जिल्ह्यातील केळवे माहिम, वसई नालासोपारा, विक्रमगड बंधन येथे 3 अशा ठिकाणांसाठी स्थळ बिंदू निश्चिती करण्यात आली आहे.
यासोबतच भिवंडी आणि गावदेवी डोंगरी अंधेरी येथे पूर्वीचे दोन बिंदू ज्यामध्ये 1 पारंपारिक आणि 1 उपयोजित महाविद्यालाचा समावेश आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सन 2024-25 ते 2028-29 च्या पंचवार्षिक बृहत आराखड्यामधील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचा वार्षिक बृहत आराखडा अधिष्ठाता मंडळाने तयार केला. तदनुसार व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत याअनुषंगाने ठराव करण्यात आला व शासनाच्या मान्यतेसाठी म्हणून अधिसभेपुढे ठेवण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या अधिसभेच्या बैठकीत हा वार्षिक बृहत आराखडा सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याच बरोबर आज पार पडलेल्या अधिसभेत मुंबई विद्यापीठाचे सन 2021-22 चे वार्षिक लेखे, आणि 31 मार्च 2022 चा ताळेबंदही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्या.उमेदवारांनी आपले अर्ज 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजण्याच्या आत पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अर्जात चुकीची माहिती भरल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास तो बाद करण्यात येईल,याची उमेदवारांनी नोंद घ्या.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम आणि अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे