'रेडिएशननंतरही पवार संसदेत यायचे, कधीकधी तोंडातून रक्त यायचे'

'महाराष्ट्राने अजूनही पवारांसोबत न्याय केला नाही'

Updated: Dec 12, 2019, 01:29 PM IST
'रेडिएशननंतरही पवार संसदेत यायचे, कधीकधी तोंडातून रक्त यायचे' title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८०वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी, शरद पवार यांच्याविषयी बोलताना काही आठवणींना उजाळा दिला. 'कॅन्सरशी झुंज देताना रेडिएशन झाल्यानंतर एका तासात शरद पवार संसदेत पोहचायचे. इतर लोक रेडियेशन झालं की झोपतात. मात्र संसदेत ते प्रश्नांना उत्तर द्यायचे, कधी कधी त्यांच्या तोंडातून एका बाजूला रक्त यायचे.' अशी आठवण प्रफुल्ल पटेल यांना करुन दिली. परंतु महाराष्ट्राने अजूनही पवारांसोबत न्याय केला नसल्याची खंतही पटेलांनी व्यक्त केली.

सार्वजनिक जीवनात काम करताना यश मिळतं, पण कधी कधी संकट येतात. त्यावर मात करताना मला आई आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूसच ताकद देत असल्याचं शरद पवार म्हणाले. सत्तेत असताना अनेक योजना राबवता येतात, अनेक योजनांची अंमलबजावणी करता येते. पण त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतात की नाही, हे केवळ सत्तेबाहेर असतानाच समजू शकते असंही पवार म्हणाले. 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना ८० लाखांचा धनादेश देण्यात आला. पवारांनी हा धनादेश पक्षाच्या कल्याणकारी निधीसाठी दिला आहे. या पैशांतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.