मुंबई मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवकांना धक्का

महापालिका निवडणुकीसाठी ओबीसींच्या 63 आणि सर्वसाधारण महिलांच्या 77 जागांवर सोडत काढण्यात आली आहे

Updated: Jul 29, 2022, 08:43 PM IST
मुंबई मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवकांना धक्का title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) आज ओबीसी (OBC) जागांसाठी सोडत काढण्यात आली. ओबीसींच्या 63 आणि सर्वसाधारण महिलांच्या 77 जागांवर सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे गेल्या वेळेसारखा यावेळीही काहींना फटका बसला आहे. 

सोडतीत कोणाकोणाला धक्का?

शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांना आरक्षण सोडतीत मोठा धक्का बसला आहे. यशवंत जाधव यांचा वॉर्ड क्रमांक 217 हा ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. तर शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासरावांनाही फटका बसला आहे. तृष्णा विश्वासरावांचा वॉर्ड क्रमांक 185 ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. हा वॉर्ड आधी ओपन होता. यामुळे आता तृष्णा विश्वासरावांना बाजूचे वॉर्ड धुंडाळावे लागणार आहेत. काँग्रेसचे माजी विरोधीपक्षनेते रवी राजा यांना सोडतीमध्ये फटका बसला आहे. रवी राजा यांचा 182 वॉर्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनाही वॉर्ड आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. त्यांच वॉर्ड क्रमांक 104 सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. 

भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड क्रमांक 109 सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. यामुळे प्रभाकर शिंदेना बाजूच्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. तर राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्रमांक 130 ओबीसी आरक्षित झाला आहे. आधी हा वॉर्ड ओपन होता. 

राखी जाधवांना आता दुसरा वॉर्ड बांधावा लागणार आहे. तर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. यामुळे आता माजी नगरसेविका असलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नीला या वॉर्डमधून संधी मिळू शकते. काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांची बहीण कमरजा सिद्दीकी यांचा वॉर्ड क्रमांक 48 हा ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. 

शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा 201 वॉर्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. यामुळे ते वॉर्ड क्रमांक 197 मधून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर माजी नगरसेवक अमेय घोले यांचा वॉर्ड क्रमांक 184 देखिल सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. 

कोणाला किती जागा ?

ओबीसींच्या 63 पैकी 53 जागांवर आपोआपच ओबीसी आरक्षण लागू झाले. कारण 2007, 2012, 2014 या तिन्ही निवडणुकीत या 53 जागांवर ओबीसी आरक्षण नव्हते. यामुळे केवळ 10 जागांवर सोडत काढून ओबीसी वॉर्ड निश्चित करण्यात आले. तर 63 पैकी 32 जागांवर ओबीसी महिला आरक्षण घोषित करण्यात आले. उर्वरित 156 ओपन जागांपैकी 77 जागा ओपन महिलांसाठी आरक्षित जाहीर करण्यात आल्या.  मुंबई महापालिकेत एकूण 236 वॉर्डस आहेत.