मुंबई : टॅक्सी सेवेमध्ये मुंबईत चांगलाच जम बसवलेली ओला ही खासगी टॅक्सी कंपनी आता बससेवेमध्ये उतरत आहे. मुंबई-ठाणे-पालघर या भागांत ओलाची ही बससेवा असेल. विशेष म्हणजे ही बससेवा वातानुकुलीत स्वरुपाची असणार आहे.
मुंबईतल्या बीकेसी ते अंधेरी, भाईंदर ते ठाणे आणि भाईंदर-पवई-भाईंदर या मार्गांवर वातानुकुलीत बससेवा लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा, ओला कंपनीनं केली आहे. शटल सेवे अंतर्गत ही सेवा सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत उपलब्ध असेल.
याकरता प्रवाशांकडून प्रत्येक किलोमीटरसाठी चार रुपये भाडं आकारलं जाणार आहे. दरम्यान अशाप्रकारे टप्पा वाहतुकीचे अधिकार मुंबईत बेस्ट आणि राज्यभरात फक्त एसटीकडेच आहेत. अशा परिस्थितीत ओला कंपनी त्याचं उल्लंघन करत आहे का असा सवाल विचारला जातोय.