'काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी पालिकेत येऊ द्या की रं'

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खास, पहा धनगरी वेशातला राज ठाकरे यांचा लूक

Updated: Feb 2, 2022, 02:22 PM IST
'काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी पालिकेत येऊ द्या की रं' title=

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीनंतर राज ठाकरे यांचं एक नवा लूक पाहिला मिळाला.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी रेश्मा टेळे या विजयी झाल्या होत्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रेश्मा टेळे यांचा मुंबईतल्या एमआयजी क्लब इथं सत्कार करण्यात आला. यावेळी रेश्मा टेळे यांनी राज ठाकरे यांना भेट म्हणून घोंगडी आणि काठी भेट दिली.

त्यांच्या आग्रहास्तव राज ठाकरे यांनी खांद्यावर घोगंड आणि हातात काठी घेत त्यांच्याबरोबर फोटोही काढला. राज ठाकरे यांच्या या लुकची चांगलीच चर्चा होत आहे.

मनसेच्या बैठकीत काय ठरलं
या बैठकीत कोणत्याही पक्षाबरोबर सध्यातरी युती करण्याबाबत चर्चा करण्यात आली नाही. राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय कार्यकर्त्यांनी युतीच्या चर्चेत पडू नये अशा सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

बैठकीत निवडणुकीची रणनिती, इच्छुक उमेदवारांची निवड यावरही चर्चा झाल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात मुंबईकरांना खूप त्रास झाला. सत्ताधारी शिवसेना मदतीसाठी पुढे आली नाही, त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे प्रभाग रचना कितीही बदलली तरी लोकांची नाराजी बदलू शकत नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.