मुंबई : डीमॅट अकाऊंट धारकांनो सावधान! तुमचं डिमॅट खातं रिकामं झाल्याचा मेसेज तुम्हाला कधीही येऊ शकतो. कारण देशात सध्या सायबर दरोडेखोरांचा सुळसुळाट आहे आणि हे दरोडेखोर सध्या शेअर बाजारातल्या छोट्या गुंतवणूकदारांना टार्गेट करताय. दरोडेखोर साधेसुधे नाहीत..ते तुमच्या नकळत तुमच्या त्यांच्या आयुष्याची कमाई पळवून नेतायत आणि तुम्हाला त्याचा सुगावाही लागू देत नाहीत. (operation demat daka zee 24 taas exclusive report about robbery on your demat)
'झी बिझनेस' आणि 'झी २४ तास'च्या इन्व्हेस्टिगेशनमधून या सायबर दरोडेखारांचा भांडाफोड केला. 'झी बिझनेस' आणि 'झी २४ तास' सातत्यानं त्यांच्या प्रेक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नात असते. काही दिवसांपूर्वी काही प्रेक्षकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या की कोणतीही सूचना किंवा मॅनडेट दिलेला नसताना त्यांच्या डीमॅट खात्यातून त्यांचे शेअर्स गायब होतायत. आणि तिथून आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरु झालं.
डीमॅटचे हे दरोडेखोर इतके खतरनाक आहेत की, त्यांच्या जाळ्यात निवृत्त सरकारी कर्मचारी, आयटी क्षेत्रातले तज्ज्ञ, आणि असे लोक ज्यांना शेअर बाजार, वायदा बाजारातली खडांखडा माहिती आहे तेही फसलेत. आतापर्यंत 'झी मीडिया'कडे आलेल्या तक्रारीत किमान 7 ते 10 कोटी रुपयांची शेअर मालमत्ता चोरीला गेलीय. पण सायबर एक्स्पर्ट्सच्या मते ही रक्कम काहीशे कोटींपर्यंत जाऊ शकते.
1 ) डीमॅटचे दरोडेखोर तुमच्या डीमॅट अकाऊंटवर अगदी बेसावधपणे हल्ला करतात. आधी तुम्हाला एक फोन येतो. त्यातून तुम्हाला तुमच्या ब्रोकरचं नाव काढून घेतलं जातं त्यानंतर सुरु होतो गोलमाल..
एनी कॉलरसारख्या अँपवरुन कॉल करुन हॅकर्स तुमचा इमेल आयडी मिळवतात आणि हाच इमेल आयडी हॅक करुन तुमच्या डिमॅटचे डिटेल्स मिळवले जातात. त्यानंतर काही कळण्याच्या आतच कोणताही ओटीपी किंवा मेसेज न येता तुमचं डीमॅट रिकामं झालेलं असतं.
डीमॅट अकाऊंट हॅक करण्याचा हा एक मार्ग आहे. असे आणखी दोन मार्ग आहे. 'झी मीडिया'च्या इन्हेस्टिगेशनमध्ये आम्ही ते मार्गही शोधून काढलेत.
2) हॅकिंगमध्ये अगदी पारंगत असणारे हे सायबर दरोडेखोर तुम्हाला केवायसी मागण्यासाठी फोन करतात. केवायसी दिल्यावर एक ओटीपी दिला जातो. जो थेट हॅकरच्या हाती जातो आणि डीमॅट रिकामं होतं.
3) तिसऱ्या मार्गानं हॅकिंग करताना बोक्ररच्या नावानं तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्याची लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही ब्रोकरच्या नव्हे तर हॅकरच्या हाती आपला नवा पासवर्ड अलगत पोहचवता आणि मग डीमॅट अकाऊंटवर डल्ला मारला जातो.
हॅकर्सचे हे कारनामे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही थेट ज्यांच्या बाबतीत हे प्रकार घडले होते त्यांच्या ब्रोकर्सशी संपर्क केला. पण ब्रोकर्सनी सरळ हात वर केले. जर एखादा ग्राहक स्वतःहून आपले पासवर्ड किंवा ओटीपी कुणाला शेअर करत असतील तर आम्ही काय करणार असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
शिवाय त्यांच्या बाबतीत ओटीपी न देता व्यवहार झाला असेल, तर त्यांचं नुकसान कसं भरुन काढता येईल याविषयी कोणताही नियम नाही असंही 'झी मीडिया'च्या तपासात पुढे आलंय.
सायबर दरोडेखोरांनी केलेली ही दरोडेखोरी म्हणजे हिमनगाचं टोक आहे. कोरोनाच्या काळात फोफावलेलं ऑनलाईन ट्रेडिंग फॅड दिसते तितकं फायद्याचं नाही, हेच यानिमित्तानं अधोरेखित होतंय. तेव्हा तुमची कष्टाची कमाई वाचवायची असेल तर वेळीच सावध व्हा.