बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? - शिवसेना

 बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. 

Updated: Sep 8, 2018, 05:35 PM IST
बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? - शिवसेना title=

मुंबई : सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडते आहे, त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल, अशी धमकी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी दिली आहे. याचाच आधार घेत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय. बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. 

बाजवा यांनी केलेल्या दर्पोक्तीनंतर मोदी सरकारने जशास तसे उत्तर न दिल्याने शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय. पाकव्याप्त काश्मीरला भारतात आणू, या आश्वासनाचं काय झालं? अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सवाल केला आहे.

‘सीमेवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,’ असे चिथावणीखोर वक्तव्य बाजवा यांनी काल पाकिस्तानच्या ५३ व्या संरक्षण दिनाच्या सोहळ्यात केले होते. या वक्तव्याला जशात तसे उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलेले नाही. यावरुन शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.