देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आता राजकारण चांगलंच तापायला लागलं आहे. येत्या पाच जूनला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौरा करणार आहेत. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
मनसेकडून पोस्टरबाजी
यावर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा मनसेने दिला आहे. यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आलेले आहेत. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहिला मिळतंय.
दौऱ्यासाठी मनसेची जय्यत तयारी
राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तिप्रदश्न करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेतर्फे 10 ते 12 रेल्वे गाड्या बूक करण्यात आल्या आहेत. दौऱ्याआधी मनसेचं एक शिष्टमंडळही अयोध्येला रवाना होणार आहे.
बृजभूषण सिंह यांचा इशारा
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असंही खासदार म्हणाले. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
कांचनगिरींचं पंतप्रधान मोदींना पत्र
राज ठाकरे यांच्या दौऱ्यावरुन तिथल्या संत, साधू मंहतांमध्येच दोन गट पडले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल असं पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं आहे. देशदर्शनासाठी कुणाला अडवलं जात असेल तर याद राखा असा इशाराही त्यांनी दिला आहे.