राष्ट्रपती राजवट दुर्दैवी, पण महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल- फडणवीस

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल.

Updated: Nov 12, 2019, 09:59 PM IST
राष्ट्रपती राजवट दुर्दैवी, पण महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल- फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.

राज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे

सध्याच्या घडीला राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. राज्यात लवकरच स्थिर सरकार पाहायला मिळेल, अशी आपण अपेक्षा करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

भाजपची सत्ता स्थापन करायचीय, कामाला लागा; फडणवीसांची राणेंवर जबाबदारी

विधानसभा निवडणुकीच्या निकालांना २० दिवस उलटूनही एकाही पक्षाला सरकार स्थापन न करता आल्यामुळे मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवली. केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारशीला मंजुरी दिल्यानंतर केंद्राच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.