मुंबई : राज्य शासनाकडून सार्वजनिक दहीहंडी (Dahi Handi) उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली असून आयोजक आणि मंडळांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. मनसेने (MNS) मात्र दहीहंडी उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी ठाण्यातील भगवती मैदानात उपोषण केलं. यावेळी ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. दरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये मनसेकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतला.
शिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही. मात्र हिंदूंचे सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसंच दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
ठाण्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, ‘जर ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये साजरी करू.’ असं थेट आव्हानच संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.
जर ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2021
दही हंडी उत्सव साजरा करण्यासाठी स्वत: राज ठाकरेंनी आदेश दिला असल्याचं मनसे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आदेश राजसाहेबांचा..हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. चलो ठाणे दहीहंडी.’ असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
आदेश राजसाहेबांचा...
हिंदू सण साजरे होणारच...यंदाची दहीहंडी दणक्यात
उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा.
चलो ठाणे— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 30, 2021
राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिसांनीही गेल्या आठवड्यापासूनच खबरदारी घेत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. त्याला गोविंदा पथकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. तसंच आयोजकांनाही दहीहंडीची परवानगी नसल्याने त्यांनाही नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन केलं जात आहे. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतरही दहीहंडी साजरी होणारच असा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे दहीहंडीच्या मुद्द्यावर ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार हे नक्की.