म्हणून राज ठाकरे अमित शाहंना भेटणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.

Updated: Jan 23, 2020, 08:58 PM IST
म्हणून राज ठाकरे अमित शाहंना भेटणार title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. मुंबईमध्ये झालेल्या मनसेच्या पहिल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. बाहेरच्या देशातून आलेले मौलवी राज्याच्या काही भागांमध्ये जात आहेत. तिकडे काहीतरी शिजत आहे, अशी माझी माहिती आहे. ही माहिती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहे, असं राज ठाकरे या अधिवेशनात म्हणाले.

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यालाही राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिलं जाईल. येत्या ९ फेब्रुवारीला मनसे पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून देण्यासाठी मोर्चा काढणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर कोणत्या भागात आहेत? ही लोकं इकडे कुठून आली? यांना कोण मदत करत आहे? हे सगळं पोलिसांना माहिती आहे. पोलिसांना ४८ तास मोकळा हात द्या , मग पोलीस काय करतात ते बघा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

कलम ३७० रद्द होणं आणि राम मंदिराचा निकाल लागल्याचा राग म्हणून हे मोर्चे निघत आहेत, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबरोबरच समझौता एक्स्प्रेसही रद्द करा, अशी मागणी राज ठाकरेंनी मोदी सरकारकडे केली आहे.