मुंबई: रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी चौथे द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसै थे ठेवण्यात आले. त्यामुळे रेपो रेट ६.५० टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ६.२५ इतकाच राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे महागाईच्या भीतीने धास्तावलेल्या सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलास मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांत महागाईचा दर वाढल्याने आजच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढवले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने तुर्तास व्याजदर स्थिर ठेवले आहेत. यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे दरही स्थिर राहणार आहेत.
मात्र, यावेळी पतधोरण समितीने सादर केलेलया आढावा अहवालात आगामी काळात महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास व्याजदरात वाढ करण्याचे संकेतही यावेळी रिझर्व्ह बँकेने दिले.