मुंबईसह ठाणे, कोकणात रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई, ठाणे, कोकण परिसरात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

Updated: Sep 5, 2019, 07:28 AM IST
मुंबईसह ठाणे, कोकणात रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी  title=

मुंबई : मुंबई, ठाणे, कोकण परिसरात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शाळा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. बुधवारी पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. परिणामी रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. आठ तासांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मध्य रेल्वेची सेवा अखेर पूर्वपदावर येताना दिसत आहे. 

सखल भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली ज्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची रुळावरुन घसरलेली गाडी रुळावर येत आहे. गुरुवारी पहाटेपासून पावसाने काशीही उसंत घेतल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी पहिली लोकल अंबरनाथच्या दिशेने रवाना करण्यात आली. सध्याच्या घडीला सीएसएमटी येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या वेळेत आहेत. पण, कल्याणकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे मात्र काहीशा उशिराने येत आहेत. हळुहळू ही परिस्थितीही पूर्वपदावर येण्याची चिन्हं आहे.  

मध्य रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडलं होतं. लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर, काही रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.

मुंबईच्या माटुंगा इथल्या किंग्स सर्कल परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं होतं. यावेळी वाहनधारक पुलावर आपल्या गाड्या तशाच उभ्याकरून निघून गेले. त्यामुळे याठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत वाहनधारक सकाळी परतले नाही तर पुलावरील वाहतूक ठप्पच राहू शकते. दरम्यान आसपासच्या परिसरात पाणी भरल्यामुळे एनडीआरएफचं पथक रात्रीच्यासुमारास याठिकाणी दाखल झालं. आणि बोटीच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवण्याचं काम सुरू केलं.