Ajit Pawar : लवकरच राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजप पक्षामध्ये प्रवेश करणारा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच शिंदे गटाचे मंत्री सातत्याने तशा प्रकारची वक्तव्य करताना दिसत आहेत. अजित पवार शरीराने महाविकासआघाडीत आहेत. पण ते मनातून कुठे आहेत येत्या चार दिवसात कळेल असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या बड्या नेत्याने केला आहे (Maharashtra Politics). या दावव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवारांबद्दल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हे खळबळजनक आणि सूचक विधान केले आहे. अजित पवार हे महाविकासआघाडीच्या सभेत मनापासून नाहीत. शरीराने ते या सभेला हजर असतील आणि ते मनातून कुठे असेल ते येत्या चार दिवसात कळेल असं विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. तर, राष्ट्रवादीला लाखोल्या वाहून बाहेर पडलेल्यांना काय बोलावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लगावला आहे.
यापूर्वी शिंदे गटाच्या एका मंत्र्यांनेच अशा प्रकारचे वक्तव्य करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं मोठं विधान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले होते. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावरून मंत्री दादा भुसेंना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा भुसेंनी हे विधान केले होते.
ठाकरे गटातील 13 आमदार, राष्ट्रवादीचे 20 आमदार तसंच काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंतांनी केला होता. आमचे राष्ट्रवादीचे 20 आमदार कुणाच्या संपर्कात नाहीत आणि ते देखील आमच्या संपर्कात नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असतील तर आम्हाला माहित नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे यामुळे या विषयी तेच सांगू शकतात असा खुलासा अजित पवार यांनी केला होता.
राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली आहे. भाजपविरोधात अजित पवार नरमाईची भूमिका घेताना दिसतात अशाही चर्चा जोरदार आहेत. तर, शिंदे गटाचे नेते सातत्याने चर्चा होईल अशी वक्तव्य करत आहेत. तेव्हा आता राज्यात कोणता राजकीय भूकंप होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.