शरद पवारांचे राजकारण भाजपलाच फायदेशीर ठरत असल्याची चर्चा

 शरद पवारांचे सध्या सुरू असलेले राजकारण भाजपलाच फायदेशीर ठरणारे असल्याची चर्चा राष्ट्रवादीतच सुरू आहे. 

Updated: Mar 20, 2019, 05:42 PM IST
शरद पवारांचे राजकारण भाजपलाच फायदेशीर ठरत असल्याची चर्चा title=

दीपक भातुसे, मुंबई : शरद पवारांचे सध्याचे राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपशी मुकाबला करायचा आहे की मदत अशी चर्चा पक्षातच सुरू झाली आहे. नगर, माढामध्ये घडलेलं राजकारण, काही मतदारसंघात दिलेले कमजोर उमेदवार यावरून राष्ट्रवादीमध्येच उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. तसं बघायला गेलं तर या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे. अन्य छोटे पक्ष आणि आघाड्या मैदानात असल्या तरी त्यांचा सार्वत्रिक परिणाम जाणवावा, एवढी त्यांची ताकद नाही... मात्र आघाडीतला एक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस नेमका कुणाच्या टीममधून खेळतोय, हे समजेनासं झालं आहे.

बीडमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार प्रतिम मुंडे यांना अमरसिंह पंडित चांगली टक्कर देऊ शकतील, अशी चर्चा होती. मात्र पक्षानं त्यांचं तिकीट कापलं आणि बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली. 

ठाण्यातही हेच घडलं. नवी मुंबईतले बडे नेते गणेश नाईक विद्यमान खासदार राजन विचारेंना आव्हान देऊ शकतील, असं मानलं जात होतं. मात्र गेली पाच वर्षं गायब असलेल्या आनंद परांजपेंना तिकिट मिळालं. 2014 च्या निवडणुकीत परांजपेंनी कल्याणमधून निवडणूक लढवली होती. 

माढ्यातून शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर मोहिते-पाटील घराण्यात उमेदवारी द्यायला स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यांची समजूत घालण्यासाठी पवारांनी काहीही केलं नाही. अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाची वाट धरली.

दिंडोरीही त्याच मार्गावर आहे. राष्ट्रवादीमधून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं ए.टी. पवार यांच्या कन्या भारती भाजपाच्या वाटेवर आहेत. 

अहमदनगरच्या जागेवरून पवारांनीच काँग्रेसची अडचण केली..सुजय विखेंसाठी जागा सोडणं शक्य असतानाही सोडली नाही. अखेर सुजय विखे-पाटीलही भाजपवासी झाले. त्यामुळे आघाडीनं हातची एक जागा जवळजवळ गमावल्यात जमा आहे. 

याशिवाय काही मतदारसंघातील उमेदवारांवरून राष्ट्रवादीमध्ये अद्यापही गोंधळ सुरू आहे. काही जागांच्या अदलाबदलीवरूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील घोळ मिटायला तयार नाही. 

नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचण्याची भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत शरद पवारांचे सध्या सुरू असलेले राजकारण भाजपलाच फायदेशीर ठरणारे असल्याची चर्चा राष्ट्रवादीतच सुरू आहे. मात्र पवारांचे हे राजकारण कुणाच्या पथ्यावर पडणार हे उघड होण्यासाठी निवडणूक निकालापर्यंत वाट पहावी लागणार आहे.