भारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला

देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन भारत-चीन सीमेवर नक्की काय सुरु आहे, याचा खुलासा करावा

Updated: May 29, 2020, 10:52 AM IST
भारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला title=

मुंबई: भारत आणि चीन यांच्यात सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कानपिचक्या दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.

सीमेवरच्या वाढत्या तणावात ड्रॅगनने नांगी टाकली, भारतासोबतच्या संबंधांवर चीन म्हणतं...
 
या अग्रलेखात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी मध्यस्थीची ऑफर देणे हा थर्डक्लास विनोद आहे. त्याऐवजी ट्रम्प यांनी प्रथम कोरोनाच्या संकटातून आपला देश सावरावा. चीनला अधूनमधून झटके येतच असतात. त्यासाठी हिंदुस्थानी सैन्य समर्थ आहे. मात्र, देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन भारत-चीन सीमेवर नक्की काय सुरु आहे, याचा खुलासा करावा, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. 

...म्हणून चीन भारतासोबत मुद्दाम घालतोय वाद?

तसेच पंतप्रधान मोदी यांनी क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यावेळी केलेल्या पाहुणचारावरही शिवसेनने खोचक टीका केली आहे. कोरोनाच्या तिरडीवरून उठलेल्या चीनची युद्धाची खुमखुमी कायम आहे. संकटाचा फायदा घेत चीन नेहमीच आपल्या सीमेवर झगडे सुरु करतो. यापूर्वी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आपले पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला नेऊन चांगलाच पाहुणचार केला होता. ढोकला, शेवगाठिया वैगेरे खायला घालून खुश केले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे पंतप्रधान मोदींबरोबर झोपाळ्यावर बसून आनंद घेत असल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे चीनचे संकट कायमचे टळले, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीनंतर हे सर्व फोल असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.