भुजबळांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

मुंबईच्या प्रमुख सर्वच चौकात भुजबळ विरोधात फलक 

Updated: Jul 26, 2019, 03:30 PM IST
भुजबळांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेनेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंगमध्ये आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु याला शिवसैनिकांनीच विरोध सुरू केला आहे. विक्रोळी येथील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी शिवसेना भवनसमोर, मातोश्रीसमोर तसेच मुंबईच्या प्रमुख सर्वच चौकात भुजबळ विरोधात फलक लावले आहेत. यात छगन भुजबळ यांचे एक कार्टून असून त्यांना लखोबा लोखंडे संबोधले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळांनी दिलेला त्रास जनता विसरू शकत नाही. म्हणून आहे तिथेच रहा असा संदेश पोस्टरमधून देण्यात आला आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंगवर शिवसैनिकांची नाराजी स्पष्ट होत आहे. आपण शिवसेनेत येणार नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते हे पाहता भुजबळांना शिवसेनेत रोखण्याचे प्रयत्न सेनेच्या आतूनच सुरू झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.