फक्त 'मरकज'वालेच नियम मोडत नाहीत- शिवसेना

ट्रम्प यांनी भारताकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत, हे आपल्याकडील उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे. 

Updated: Apr 7, 2020, 11:03 AM IST
फक्त 'मरकज'वालेच नियम मोडत नाहीत- शिवसेना title=

मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ५ एप्रिलला  देशभरात साजऱ्या करण्यात आलेल्या दीपप्रज्वलनाच्या उत्सवावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. मोदींच्या या उपाययोजनेमुळे रविवारी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. अनेकजण काळोखात झुंड करून रस्त्यावर थयथया नाचत होते. हा सगळा प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल. पंतप्रधान काय म्हणतात हे समजून न घेता जनता मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे. पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोक आपली सोय पाहत आहेत. एकूण पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. परंतु, सरतेशेवटी जे घडते आहे तसे उत्सवी वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.

अमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प

या अग्रलेखात दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमाविषयीही भाष्य करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांमुळे देशभरात कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर फैलाव झाला. त्यामुळे अनेकजण सध्या मरकजला लक्ष्य करत आहेत. मात्र, ५ एप्रिलला रस्त्यावर झालेल्या गर्दीचा दाखला देत शिवसेनेने नियम फक्त 'मरकज'वालेच मोडत नाहीत, असे म्हटले आहे. मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत, असा परखड सवाल शिवसेनेने विचारला आहे. 

लोक केवळ चीनला शिव्या देण्यात धन्यता मानत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चीनमधील जनता घरीच बसून होती. चीनला सतत शिव्या देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या कोरोनामुळे हतबल झाले आहेत. त्यांनी मोदींकडे कोरोनाशी लढण्यासाठी औषधे मागितली आहेत. त्यांनी आपल्याकडे थाळ्या, घंटा, मेणबत्या, शंख किंवा पणत्या मागितलेल्या नाहीत, हे आपल्याकडील उत्सवी आणि उत्साही प्रजेने समजून घेतले पाहिजे, असेही या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे.