भाजपमधील काहीजण काँग्रेसमध्ये येऊ शकतात- अशोक चव्हाण

राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही प्रयोग करायचा भाजपचा प्रयत्न आहे. 

Updated: Aug 10, 2020, 05:50 PM IST
भाजपमधील काहीजण काँग्रेसमध्ये येऊ शकतात- अशोक चव्हाण

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: भाजपमधील काही आमदार महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, स्थिर सरकार असल्यामुळे इतर पक्षातील नेत्यांनी आमच्याकडे येणे स्वाभाविक आहे. अनेक लोक त्यासाठी सध्या प्रयत्नशील आहेत. यापैकी काहीजण काँग्रेसमध्ये येऊ शकतात, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. 

भाजप सोडून कोणी जातं का? चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली

तसेच महाविकासआघाडीतील आमदार फुटणार असल्याचे वृत्त अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले. या चर्चेत तथ्य नाही. सरकारला काम करु द्यायचे नाही. कारण नसताना सरकार अस्थिर असल्याचा प्रचार केला जात आहे. राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही प्रयोग करायचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, आमची एकजूट असल्यामुळे हा प्रयोग यशस्वी होणार नाही, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

'फोडाफोडीचे राजकारण काय असते हे राष्ट्रवादी भाजपला दाखवून देईल'

यावेळी अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्यांनाही धारेवर धरले. हा एका षडयंत्राचा भाग आहे. जी मंडळी आंदोलन करतात त्यांचा बोलवता धनी भाजप आहे. हे भाजप पुरस्कृत आंदोलन आहे. मराठा आरक्षणाची बाजू मांडताना सरकार कुठे कमी पडत आहे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. उलट आंदोलन म्हणजे मोठा कट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटत असणाऱ्यांकडूनच हे उपद्व्याप केले जात असल्याची टीकाही यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.