मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्ताने रेशनकार्डवर जादाची साखर आणि डाळ मिळणार आहे. रेशनकार्डवर अवलंबून असलेल्यांसाठी दिवाळीनिमित्त ही एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी गोड करण्यासाठी रेशनकार्डवर नेहमीच्या कोट्यापेक्षा एक किलो साखर , एकूण दोन किलो डाळ अधिक मिळणार आहे. एवढंच नाही तर आरोग्यासाठी आवश्यक असलेले आयोडीन युक्त मीठ मिळणार आहे.
साखर नेहमीपेक्षा काहीशी स्वस्त म्हणजे 20 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार आहे. तर डाळ नेहमीच्याच दरांत म्हणजे 35 रुपये प्रति किलो दराने दिली जाणार असल्याची माहित अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.
डाळीमध्ये तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ घेण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. एवढंच नाही तर सणासुदीच्या काळांत खव्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विविध ठिकाणी भरारी पथक नेमले जात तपासणी केली जाणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केलं आहे.