केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावला; १०० डॉक्टर्सचे पथक मुंबईला रवाना

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

Updated: Jun 1, 2020, 09:03 AM IST
केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावला; १०० डॉक्टर्सचे पथक मुंबईला रवाना title=

मुंबई: राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना आता केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने केरळमधून डॉक्टर्स आणि परिचारिकांना (नर्सेस) पाचारण करण्याचा विचार बोलून दाखवला होता. यानंतर लगेचच केरळने पुढाकार घेत मुंबईतील डॉक्टर्सच्या मदतीसाठी १०० जणांचे पथक पाठवले आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून थोड्यावेळात मुंबईत पोहोचेल. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. केरळच्या टीव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संतोष कुमार या पथकाचे नेतृत्व करत आहेत. तर केरळच्या डॉक्टरांचे आणखी एक पथक अगोदरच सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती थॉमस इसॅक यांनी दिली.

असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे, असे काही दिवसांपूर्वीच डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. डॉ. लहाने हे राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यंत्रणेचे (DMER) प्रमुख आहेत. २५ मे रोजी त्यांनी केरळ सरकराला मदतीसाठी डॉक्टर्स पाठवण्याची विनंती करणारे पत्र पाठवले होते. यानंतर केरळकडून अवघ्या पाच दिवसांत १०० जणांचे पथक मुंबईला पाठवण्यात आले आहे. 

'महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान', मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

केरळने शिस्तबद्ध उपाययोजनांच्या जोरांवर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आजघडीला केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या केवळ हजाराच्या आसपास आहे. याशिवाय, केरळमधील मृत्यूदरही कमी आहे. त्यामुळे देशभरात केरळ मॉडेलची जोरदार चर्चा सुरु आहे.तर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६५, १६८ इतकी झाली आहे. यापैकी ३४,८९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २८,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, कोरोनामुळे राज्यातील २,१९७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.