ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

मंत्रिमंडळ विस्ताराचा २३ डिसेंबरचा मुहूर्तही हुकणार

Updated: Dec 20, 2019, 11:23 AM IST
ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर title=

मुंबई: ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडणार आहे. येत्या २३ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे कालपर्यंत सांगितले जात होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याचे समजते. त्यासाठी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सोमवारी दिल्लीला जाणार आहेत. विस्ताराबाबत थोरात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच काँग्रेसमधील भावी मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 

काल अजित पवार यांनी २३ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र सोमवारी दिल्लीत विस्ताराबाबत चर्चा असल्यामुळे सोमवारनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वाणी संतांची पण वर्तणूक मंबाजीची; शिवसेनेचा भाजपला टोला

२८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येक दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, यानंतर २२ दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी अडखळून पडले 'त्या' पायऱ्याच तोडणार

काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारकडून तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेला मिळणार आहे.  तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्ता, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत.