Thane News : देशभरात दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा (rakshabandhn) सण साजरा करण्यात आला आहे. मात्र ठाण्यात (Thane) या सणाला गालबोट लागलं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या भांडणातून एका महिलेनं तिच्या बाळासह स्वतःला संपवलं आहे. ठाणे शहरात एका महिलेने तिच्या एक वर्षाच्या मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इमारतीमधील रहिवाशांना पोलिसांना (Thane Police) याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात घोडबंदर रोड भागात ही घटना घडली आहे. प्रियांका मोहिते असे मृत महिलेचे नाव असून ती घोडबंदर रोड येथील एका इमारतीत पती आणि वर्षभराच्या मुलासह राहत होती. मृत 26 वर्षीय प्रियांका आणि तिचा पती यांच्यात वाद सुरू होता. कौटुंबिक कारणावरून दोघांमधलं भांडण इतके वाढले की, महिलेने आपले आणि आपल्या निष्पाप मुलाचे जीवन संपवले.
प्रियंका मोहिते ही पती आणि लहान मुलासोबत घोडबंदर रोडवरील एका इमारतीत राहत होती. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी महिलेला तिच्या बहिणीच्या घरी जायचे होते, मात्र तिच्या पतीने तिला मुलासोबत प्रवास करण्यापासून रोखले. यावरून दाम्पत्यामध्ये जोरदार वाद झाला आणि महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रियांकाला तिच्या बहिणीच्या घरी जायचे होते. मात्र पतीने त्यास नकार दिला. एवढ्या लहान मुलाला घेऊन प्रवास करू नकोस असे पतीने प्रियांकाला सांगितले होते. यावरुनच दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादानंतर रागावलेल्या प्रियांकाने वर्षभराच्या मुलासह मध्यरात्री 1.30 च्या सुमारास फ्लॅटच्या बाल्कनीतून थेट खाली उडी मारली.
रात्री दीडच्या सुमारास प्रियांकाने आपल्या एक वर्षाच्या मुलाला हातात घेऊन फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारली. आवाज ऐकून आजूबाजूच्या लोक इमारतीबाहेर आले. त्यांना प्रियांका आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मात्र, ही इमारत किती मजली आहे आणि मृत प्रियांका कोणत्या मजल्यावर राहत होती, हे पोलिसांनी सांगितले नाही. या घटनेनंतर इमारतीमध्ये शोककळा पसरली आहे.