दादरमध्ये कोरोनाचं वाढतं संकट; एका दिवसांत ५९ रुग्णांची वाढ

दादरमध्ये कोरोनाचं संकट वाढतचं आहे. 

Updated: Jul 15, 2020, 07:15 PM IST
दादरमध्ये कोरोनाचं वाढतं संकट; एका दिवसांत ५९ रुग्णांची वाढ
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोना नियंत्रणात येत असताना, दादरमध्ये कोरोनाचं संकट वाढतचं आहे. आज दादरमध्ये एका दिवसांत तब्बल 59 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दादरमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1277 इतकी झाली आहे. दादरमध्ये 386 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दादरमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन स्क्रिनिंग कॅम्प सुरु केल्याने रूग्णसंख्या वाढत असल्याचं पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये केवळ एक कोरोना रुग्ण आढळला होता. मात्र आज धारावीत एका दिवसांत 23 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर माहिममध्ये 17 नवे रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. मुंबईतील कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती आहे. तर मुंबईच्या 24 विभागांपैकी 17 विभागातील कोरोना रुग्णावाढीचा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे. यापैकी काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. सध्याच्या घडीला या 17 विभागांमध्ये 1.34 टक्क्याच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. तर उर्वरित सात विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर 2.5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 95,100 इतका झाला आहे. त्यापैकी 66,633 रुग्ण बरे झाले असून 5405 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 22,773 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.