मुंबईत कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली, काळजी घ्या..

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झाला तरी पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे.  

Updated: Jun 29, 2021, 08:51 AM IST
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली, काळजी घ्या..  title=

मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झाला तरी पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai) शहरात कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण येत असताना आता रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तिसऱ्या लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) चांगले नियंत्रण मिळवले तरीही काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असताना यात वाढू होऊ लागली आहे. मागील आठवड्यामध्ये रुग्णसंख्येमध्ये 2800 ची भर पडली आहे. अंधेरी, गोरेगाव, दहिसर, ग्रँटरोड आणि वांद्रे या ठिकाणी रुग्णदुपटीचा कालावधी सातशे दिवसांपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. परळमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी नऊशे दिवसांपेक्षा अधिक असला तरीही रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना आकडेवारीवरून दिसून येते.

28 जून, संध्याकाळी 6.00 वाजता 24 तासात बाधित रुग्ण - 608 सापडले आहेत. तर 24  तासात बरे झालेले रुग्ण - 714 तर बरे झालेले एकूण रुग्ण -  694796 बरे झालेल्या रुग्णांचा दर - 96 टक्के आहे. एकूण सक्रिय रुग्ण-  8453 आहेत. तर दुप्पटीचा दर- 728 दिवसांचा आहे. कोविड वाढीचा दर ( 21 जून ते  127 जून)- 0.09 टक्के आहे.

दरम्यान, मुंबईत 20 जून रोजी 687084 इतकी रुग्णसंख्या होती, तर  27 जून रोजी 689890  रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच सात दिवसांत रुग्णसंख्येमध्ये 2806 ची भर पडली. अंधेरीमध्ये या कालावधीत 571, गोरेगाव येथे 271, ग्रँटरोड येथे 260 आणि परळ येथे 103 रुग्णसंख्येची भर पडली आहे. मुंबईमध्ये के पश्चिम प्रभागामध्ये 0.15 टक्के इतका सर्वाधिक साप्ताहिक रुग्णवाढीचा दर नोंदवण्यात आला आहे.  

लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मुंबईत ३,७८० इतकी असून लक्षणे असलेली रुग्णसंख्या ३,९९८ आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या ८०४ असून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ६,९४,०८२ आहे. आत्तापर्यंत मुंबईमध्ये ७६,५२,१२० मुंबईकरांनी विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या १,३७,२६१ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये, तर ८३८ जण संस्थात्मक विलगीकरणामध्ये वैद्यकीय उपचार घेत आहेत.

 मुंबई महापालिकेने केलेल्या पहिल्या सिरो सर्वेक्षणामध्ये झोपडपट्ट्या तसेच चाळींमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडी अधिक विकसित झाल्याचे दिसून आले होते. तर मुंबईतील 51.78 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत.  वयवर्ष 10 ते 14 वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे 53.43 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील लहान मुलांचे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण (Serological surveys) केलं. यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज विकसीत झाल्याचं आढळले आहे. 

संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संसर्गाचा जोर इमारती तसेच रहिवासी संकुलांमध्ये अधिक दिसत होता.  दरम्यान, तिसरी लाट आली तर हा फैलाव 30 ते 39 या वयोगटामध्येही अधिक असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.