काँग्रेसच्या मनधरणीसाठी 'मातोश्री'वरून खास निरोप; पडद्याआडच्या हालचालींना वेग

काँग्रेसने या निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

Updated: May 10, 2020, 11:10 AM IST
काँग्रेसच्या मनधरणीसाठी 'मातोश्री'वरून खास निरोप; पडद्याआडच्या हालचालींना वेग  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे चुरस निर्माण झाली आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आणि काँग्रेसची एक जागा सहजपणे निवडून येईल. मात्र, काँग्रेसने या निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवल्याने चुरस निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीला उभे असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न आहे. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी दोन उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. 

‘’‘मोदी गो बॅक’ घोषणा देणाऱ्याला भाजपचं तिकीट’’

त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. काल रात्रीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय  मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचा खास निरोप घेऊन थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. थोरात यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी रात्री उशिरा नार्वेकर भेट घेत ठाकरे यांचा निरोप दिल्याची चर्चा आहे. तर शरद पवार आणि संजय राऊत यांनीदेखील उमेदवार मागे घेण्यासाठी थोरातांशी संपर्क साधल्याचे समजते.

त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता.