मुंबई : सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरु असून सरकार संघाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अमोल पालेकर आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याला तेच दिसतं असल्याचं ते म्हणाले. तसंच शरद पवार यांनी निवडणूक लढवावी कारण राजकारणात असणाऱ्यांनी निवडणूक लढवण्याची स्वप्न का बाळगू नये असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
याचबरोबर नितीन गडकरी स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम आहेत. कारण त्यांच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचंही ते म्हणाले. नितीन गडकरींची मला काळजी वाटते, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं, त्यावर प्रकाश आंबे़डकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२३ तारखेला परवानगी मिळाली तर मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसंच आरएसएसला संविधानिक चौकटीत आणलं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. काँग्रेसकडे आम्ही जागांसंदर्भात केलेली मागणी कायम आहे, आता त्यांनी काय करायचं ते ठरवावं, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाटचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे.
याखेरीज मुंबईतील आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाणं आहेत. त्यांची सीमांकन करुन त्यांच्या संपत्तीचे मालकी हक्क मिळावेत तसंच झोपडपट्टी विकास गावठाण हक्क कायद्यानं क्लस्टर आणि आरएला आमचा विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतून आगरी कोळी भंडारी यांना बाहेर काढण्याचा डाव सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.