राज ठाकरेंनी उगाच मुसलमानांच्या नावाने ढोल बडवू नये- आंबेडकर

राज ठाकरेंना भारतामधील पाकिस्तानी आणि बांगलादेशींचा नेमका आकडा माहिती आहे का?

Updated: Jan 24, 2020, 12:24 PM IST
राज ठाकरेंनी उगाच मुसलमानांच्या नावाने ढोल बडवू नये- आंबेडकर

मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA)समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले आहे. राज ठाकरे यांच्याकडे भारतामध्ये किती पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोक आले आहेत, याचा नेमका आकडा आहे का? अन्यथा त्यांनी तथ्यहीन बोलू नये. तसेच उगाच मुसलमानांच्या नावानेही ढोल बडवू नये, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) व केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात 'वंचित'ने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची मदत करू नये, असे आवाहनही केले.

घाटकोपर, ठाण्यात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) काढण्यात येणाऱ्या मोर्च्यांविषयी संताप व्यक्त केला होता . बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही राज यांनी केली होती.

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..

राज ठाकरे यांच्या भाषणाचा एकूण नूर पाहता मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोर आपल्या देशात मोठ्या संख्येने आहेत. भारतात अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे देशांतर्गत धोका निर्माण झाल्याचे राज यांनी म्हटले होते. तसेच आमच्या आरतीचा कुणाला त्रास होत नाही. मग तुमच्या मशिदीवरील भोंग्याचा त्रास आम्ही का सहन करायचा?, असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी एकप्रकारे आपल्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली.