चित्रपटासाठी कोकण हॉट डेस्टिनेशन

पर्यटकांबरोबरच आता चित्रपट सृष्टीलाही रत्नागिरीबरोबरच दापोलीची भुरळ पडली आहे. रत्नागिरी परिसर आणि दापोलीत चित्रपटांचे चित्रिकरण करण्यास निर्माते प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे हिंदी आणि मराठी सिनेमांचा दिग्दर्शकांचा

Updated: Jan 31, 2012, 12:20 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी

 

पर्यटकांबरोबरच आता चित्रपट सृष्टीलाही  रत्नागिरी आणि दापोलीची भुरळ पडली आहे. रत्नागिरी परिसर आणि मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणाऱ्या दापोलीत चित्रपटांचे चित्रीकरण करण्यास निर्माते प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांचा कोकणकडे ओढा दिसून येत आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांचे शुटींग येथे होत आहे.

 

 

नितांत सुंदर समुद्र किनारा, डोंगर, दऱ्या, खाड्या, बंदरे, किल्ले, प्राचीन मंदिरे, नारळी पोफळीच्या बागा, कोकण कृषी विद्यापीठ, समुद्रातील डॉल्फिन, विविध पक्षी व आल्हाददायक हवामान यामुळे संपूर्ण राज्यातील पर्यटकांचे रत्नागिरी आवडते ठिकाण बनले आहे. निसर्ग सौंदर्य कॅश करण्यासाठी जमिनींमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

 

 

संपूर्ण चित्रपट  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रीत होऊ शकतो एवढी क्षमता दोन्ही जिल्ह्यांची आहे. त्यातही अन्य ठिकाणांपेक्षा रत्नागिरीतीर आरे-वारे बिच, भाटे बिच, पावस, गणपतीपुळे, वरवडे, जयगड, दापोली तर सिंधुदुर्गात आंबोली, तारकर्ली, कुणकेश्वर, मालवण आदी ठिकाणी चित्रपटांचे चित्रिकरण केले, तर खर्चही कमी होतो. त्यामुळे भविष्यात  कोकणात चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.  या सर्वांतून आता  एक नवी अर्थव्यवस्था निर्माण होणार असून कोकणचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढणार आहे.

 

 

याआधी दापोलीत श्‍यामची आई, गारंबीचा बापू, दादा कोंडके यांचा एक चित्रपट, षंढयुग या चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते; मात्र नंतर अनेक वर्ष दापोलीत चित्रीकरण झाले नव्हते; मात्र समीर धर्माधिकारी यांच्या 'निरोप' चित्रपटाचे चित्रीकरण चार वर्षांपूर्वी झाले आणि दापोलीचे सौंदर्य राज्यभरात पोहोचले. प्रवीणकुमार भारदे यांच्या 'आईसाठी' चित्रपटाचे चित्रीकरण झाले. त्यानंतर सचिन कुंडलकर यांच्या 'गंध' चित्रपटाचे चित्रीकरण आसूदबाग येथे झाले आणि एक वर्षापूर्वी किरण यज्ञोपवीत यांच्या 'ताऱ्यांचे बेट' या चित्रपटाचे चित्रीकरण दापोलीत झाले.  काही दिवसांपुर्वी मोहन जोशी, अनिकेत विश्‍वासराव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. यातून निर्माते आता दापोलीत चित्रिकरणाला प्राधान्य देऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.