www.24taas.com, मुंबई
राज्यातील उद्या होणाऱ्या (दि. १६) मतदानासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मतदानाची पूर्ण तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, उद्या सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईत तब्बल २५ हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ८३ तडीपार गुंडांसह सुमारे बाराशेजणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ३00 वर परवानाधारक हत्यारे जप्त करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी सांगितले. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. दादरमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने दोन दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कोठेही गडबड होवू नये, म्हणून पोलिसांनी गस्त वाढविली आहे.
राज्यातील १0 महापालिका क्षेत्रात निवडणुकांच्या निमित्ताने सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रचाराची रणधुमाळी थंडावल्याने उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली होती. उद्या १६ तारखेला मतदान होणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर १७ तारखेला जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल.
मुंबई पालिकेची ही तेरावी निवडणूक आहे. १ कोटी २ लाख ७९ हजार ३७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी ८ हजार ३२६ मतदान केंद्र असणार आहेत. तर ४१ हजार निवडणूक कर्मचारी आणि २४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.