'चेल्सी - चॅम्पियन ऑफ दी युरोप'

107 वर्षांच्या इतिहासात ‘चेल्सी’नं पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियन्स लीग जिंकलीय. पेनल्टी शूट आऊटमध्ये बार्यन म्युनिकचा 4-3 असा पराभव करत चेल्सीनं विजेतपद पटकावलयं.

Updated: May 21, 2012, 11:16 AM IST

www.24taas.com, म्यूनिक, जर्मनी

 

107 वर्षांच्या इतिहासात ‘चेल्सी’नं पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियन्स लीग जिंकलीय. पेनल्टी शूट आऊटमध्ये बार्यन म्युनिकचा 4-3 असा पराभव करत चेल्सीनं विजेतपद पटकावलयं.

 

चेल्सी चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला. चेल्सीनं युरोपमधील या वर्षाची सर्वोत्तम फुटबॉल टीम होण्याचा मान पटकावलाय. युरोपियन चॅम्पियन लीगचे पहिलेवहिले जेतेपद पटकावत चेल्सीन इतिहास रचलाय. तर चारवेळेचे विजेते असलेल्या बार्यन म्युनिकचं पाचव्यांदा विजेतेपदाच स्वप्न भंगल.

 

2008 नंतर पहिल्यांदाच फायनल गाठलेल्या चेल्सीसमोर आव्हान होत ते बायर्न म्युनिकचं. चेल्सिन बायर्न म्युनिकचा त्यांच्या घरच्या मैदानात पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत हा चमत्कार केलाय. 90 मिनिटांच्या पूर्ण वेळेत मॅचमध्ये दोन्ही टीम्सने 1-1 गोल केल्याने मॅचचा निकाल लागला नाही आणि जास्तीची वेळ देण्यात आली. मॅचमध्ये सुरुवातीपासूनच बार्यन म्युनिकचं वर्चस्व होतं. 83 व्या मिनिटाला म्युनिककडून थॉमस म्युलरने पहिला गोल करत मॅचवर आपली पकड घट्ट केली. विजेतेपद हातातून निसटतंय असं दिसताच चेल्सिच्या प्लेअर्सनं आक्रमक पवित्रा घेतला आणि 88व्या मिनिटाला दिदिए ड्रोग्बानं आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण गोल करत सामना बरोबरीत आणला. निकाल न लागल्यानं एक्स्ट्रा टाईम देण्यात आला त्यामध्येही दोन्ही टीम्सकडून एकही गोल झाला नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये मॅच गेल्याने दोन्ही टीम्सचे स्ट्रायकर्स विजेतेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मॅचचा निकाल लागणार हे दिसताच फुटबॉल प्रेमींमध्ये उत्कंठा वाढली. शूटआऊट सुरु झाले आणि फुटबॉल प्रेमींनी श्वास रोखून धरले. चेल्सिकडून डेव्हिड लुईज, फ्रँक लैम्पार्ड, एशले कोल आणि फिलीप लाम यांनी अचूक गोल करत 107 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चेल्सिला चॅम्पियन्स लीगच जेतेपद मिळवून दिलं.