'आयपीएल'पेक्षा 'बिग', म्हणे पाकची प्रीमियर लीग !

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी) लवकरच स्वतःची प्रीमियर लीग सुरू करणार असून ही प्रीमियर लीग आयपीलपेक्षा मोठी असणार आहे असं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष चौधरी झाका अश्रफ यांनी केलं आहे.

Updated: Jan 4, 2012, 09:53 PM IST

www.24taas.com, लाहोर

 

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी) लवकरच स्वतःची प्रीमियर लीग सुरू करणार असून ही प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपील) पेक्षा मोठी असणार आहे, असं दर्पोक्ती पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष चौधरी झाका अश्रफ यांनी केली आहे.

 

झाका अश्रफ म्हणाले, की पीसीबी लवकरच स्वतःची प्रीमियर लीग आणणार असून पाकिस्तानी खेळाडू आता या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या प्रीमियर लीगमध्ये खेळतील. आता त्यांना यासाठी ‘आयपीएल’मध्ये सामिल व्हायची गरज नाही.

 

झाका अश्रफ म्हणाले, “आम्ही काही बड्या प्रायोजकांशी बोलणी करत आहोत. त्यांनी आम्हांला सहकार्य करत स्वतःच्या टीम्स या देशाच्या भव्य प्रीमियर लीगसाठी निवडाव्यात. आमची प्रीमियर लीग ही ‘आयपीएल’पेक्षा जास्त चांगली असेल. यामुळे आमच्या देशातील क्रिकेट प्रेमींना त्यांचे खेळाडू आपल्याच देशातल्या खेळपट्ट्यांवर धावताना दिसतील. याने क्रिकेटप्रेमी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील.”

 

झाका अश्रफ पीसीबीचे यापुढे जेमतेम चार-पाच महिनेच अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे आपण या काळात आपण आपल्या खेळाडूंच्या भल्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा मान वाढावा आणि क्रिकेटला नवीन उंची प्राप्त व्हावी म्हणून हा प्रयत्न करत असल्याचं झाका अश्रफ म्हणाले.