www.24taas.com, मुंबई
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?
मंगळवारी विधान भवनात सूर्यवंशी यांना भारिप आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या या आमदारांनी मला मारहाण केली त्यामुळे मी माझ्या सरकारी नोकरीचा राजीमाना देणार आहे. मला आता नोकरीच करायची नाही, अशी माहिती सचिन सूर्यवंशी यांनी दिलेय. मला झालेल्या मारहाणीमुळे पोलिसांचे मनोर्धैय खचले आहे. हे लोकप्रतिनिधी नसून हे गुंड आहेत, अशी प्रतिक्रिया सूर्य़वंशी यांनी दिली.
दरम्यान, सचिन सूर्यवंशी यांच्या आईने त्यांची भेट घेण्यासाठी रूग्णालयात धाव घेतली आहे. आमदारांकडून झालेल्या मारहाणीचे दु:ख होत आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सूर्यवंशी यांच्या आईने केली आहे.