सेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2013, 08:21 PM IST

www.24taas.com,कल्याण
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले.
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सेना-भाजप युती पुरस्कृत अपक्ष नगरसेवक प्रकाश पेणकर यांची निवड झाली करण्यात आली तर परिवहन सभापतीपद मनसेच्या राजेश कदम यांच्या वाट्याला आले. त्यामुळे युतीत मनसेचे कल्याण झाल्याचे दिसून आले. सभापती निवडणुकीसाठी कोकण भवनचे अप्पर आयुक्त शिवाजीराव दौडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
शनिवारी झालेल्या या निवडणुकीत स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने तटस्त राहत शिवसेनेला सहाय्य केले. त्यामुळे परिवहनच्या निवडणुकीत शिवसेना सदस्यांनी मनसेच्या उमेदवारास मतदान करत उघड सहकार्य केले. त्यामुळे मनसेच्या वाट्याला परिवहन समिती आली.

स्थायी समिती सभापती पदासाठी प्रकाश पेणकर आणि राष्ट्रवादीच्या रणजीत जोशी यांच्यात लढत होती. जोशी यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांची पाच मते मिळाली. तर सेना- भाजप आणि युतीची ७ मते पेणकरांना मिळाली. या प्रक्रियेमध्ये मनसेची चार मते निर्णायक ठरणारी होती मात्र मनसेच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग न घेता ही निवडणूक शिवसेना भाजप युतीच्या पारड्यात टाकली आणि पेणकरांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
परिवहन समितीच्या निवडणुकीत मनसे उमेदवारास खुलेपणाने शिवसेनेने साथ देत राजेश कदम यांना विजयी केले. परिवहन समितीमध्ये शिवसेनेचे ४ , भाजपचे २ आणि मनसेचे ३ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र कपोते तर मनसेच्यावतीने इरफान शेखदेखील उत्सुक होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्यावतीने सभापतीपदासाठी प्रयत्न होत होता. मात्र सेना आणि भाजप यांनी मनसेला साथ दिली.