भारतात हरवले पाकिस्तानी नागरिक!

गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 9, 2012, 01:16 PM IST

www.24taas.com, नागपूर
पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या धक्क्यातून महाराष्ट्र पुरता सावरलेला नसतानाच आणखी एक धक्कादायक बातमी ‘झी २४ तास’च्या हाती लागलीये. गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.
शहरात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद ठेवावी लागते. त्यानुसार नागपुरात गेल्या १७ वर्षात ९,७०५ पाकिस्तानी नागरिक आले. यातल्या २,०१३ नागरिकांबाबत नागपूर पोलिसांना माहिती आहे. मात्र, उरलेल्या ७,१५९ पाकिस्तानी नागरिकांचा पोलिसांना ठावठिकाणा नाही. या पाकिस्तानी नागरिकांपैकी काहीजण दहशतवादी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नागपुरातील आरटीआय कार्यकर्ते एजाज खान यांनी नागपूर पोलिसांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकांची नोंद आणि त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांनी ठेवणं गरजेचं असतं. नागपूर पोलिसांनी मात्र याबाबीकडं दुर्लक्ष करुन सुरक्षेशी खेळ केल्याचं समोर आलंय. एकट्या नागपूर शहराचं एवढा सावळा गोंधळ आहे तर देशभराचा विचार न केलेलाच बरा!