www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडमधल्या सध्याच्या टॉप हिरॉइन्सची `ड्रेसिंग स्टाईल` हा तरुणाईचा चर्चेचा विषय आहे. जुन्या काळातल्या हिरॉईन्सच्या स्टाईल्स पुन्हा रुपेरी पडद्यावर येऊ पाहत आहेत. सध्या हा विषय चर्चेत आलाय तो प्रियांका चोप्राच्या `तेरी मेरी कहानी`तून `मुमताज स्टाईल`मुळे...
बॉलीवूडमध्ये एखादी स्टाईल आली आणि त्याची चर्चा झाली नाही तर नवलंच... जुन्या काळातल्या अशाच काही पॉप्युलर स्टाईल आता पुन्हा येत आहेत. विशेष म्हणजे मुमताज साडी... `आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे...` या गाण्यातील मुमताजची स्टाईल ४० वर्षानंतर प्रियांका चोप्रा `तेरी मेरी कहानी`मधून एका स्टायलिश लूकने आणतेय.
त्याकाळी मुमताज, श्रीदेवी, डिंपल कपाडिया या अभिनेत्रींच्या फॅशन्स त्यांच्या काळात खूप पॉप्युलर झाल्या. ७०-८० च्या दशकातल्या त्या स्टाईल्स एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा डोकाऊ लागल्यात. आधीच्या काळातल्या स्टाईल आयकॉन समजलल्या जाणाऱ्या आशा पारेख, वैजयंतीमाला यांनी पंजाबी ड्रेसमधले वेगवेगळे आविष्कार आणले त्यातलाच एक म्हणजे टाईट फिटींगचा कुर्ता आणि चुडीदार... बॉलीवूडमध्ये सध्या बऱ्याच हिरोईन्स असा कुर्ता घातलेला दिसून येतात.
`बॉबी`मधून झळकलेल्या डिंपल कपाडियाचे ठिपकेदार शर्ट-टॉपच्या स्टाईलने तर तेव्हाचा काळ गाजवला. अजूनही त्या ठिपक्यांना `बॉबी प्रिंट` अशी ओळख आहे. पण हल्ली याच पॅटर्नला पोल्का डॉट्स म्हटलं जातं. प्राची देसाई, बेबो करिना अशा स्टाईलमध्ये पाहायला मिळाल्यात.
साड्यांमध्येही बॉलीवूडच्या हिरोईन्स हल्ली चांगल्याच कम्फर्टेबल दिसून येतात. श्रीदेवीची मिस्टर इंडियामधली निळी, जाँबाज मधली लाल रंगाची साडी यामुळे मोठ्या पडद्यावरचं फॅशन कोशंट आणखीन वाढलं. अशाच शिफॉन साड्यांच्या फॅशनमध्ये झळकतेय ती शॉर्टगन सोनाक्षी सिन्हा... दबंग सिनेमातील तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला.
सत्तरीच्या दशकातली झीनत, परवीन यांच्या ढगळ, बेल बॉटम पँट आता `पलाझो` म्हटलं जातं. `कॉकटेल`मधल्या याच दिपाकाच्या पँट्सची खूप चर्चाही झाली. मधूबालाच्या अनारकली सूटने तर भल्याभल्यांना वेड लावलं. ही स्टाईल `बी-टाऊन`मध्ये ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच पाहायला मिळते. बहुतेक अॅवॉर्ड्स सोहळ्यात रेड कार्पेटवर अनारकली ड्रेसमधल्या हिरोईन्सचा लूक त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. एकूणच, या फॅशन स्टेटमेंट्सनी बॉलीवूडचं समीकरणंच बदलून गेलं असं म्हणायला हरकत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.