www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.
कोर्टाच्या या आदेशामुळं साक्षी-पुराव्यांची पुन्हा तपासणी केली जाईल. पोलिसांनी सलमान विरोधात बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र कोर्टानं सलमान विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन केसची सुनावणी करण्याचा आदेश दिला होता. कोर्टाच्या या आदेशाला सलमाननं आव्हान दिलं होतं. सलमानची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं हिट अँड रन केसची नव्यानं सुनावणी करण्याचा आदेश दिला आहे.
सरकारी पक्षानं सलमान प्रकरणाची नव्यानं सुनावणी करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतली होती. केस दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून लांबली आहे. अशा परिस्थितीत नव्यानं सुनावणी म्हणजे केस आणखी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न असल्याचं मत सरकारी वकिलांनी व्यक्त केलं. सलमाननं २८ सप्टेंबर २००२ रोजी वांद्रे इथल्या एका बेकरीसमोर झोपलेल्यांना गा़डीनं उडवलं होतं. या अपघातात एक ठार आणि चारजण जखमी झाले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.