www.24taas.com, मुंबई
शाहरुखनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याला पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी आणखी हवा दिली आणि सुरू झाला दोन देशांमधला वाद... भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक वैऱ्यांमध्ये त्याचे पडसाद दिसून आले. पण, मला भारतीय असल्याचा गर्व आहे आणि मला फुकटचे सल्ले नकोत, असं सांगत शाहरुखनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच शाहरुखसाठी त्याची अत्यंत जवळची मैत्रिण मानली जाणारी प्रियांका चोप्रा धावून आलीय.
न्यू यॉर्क टाइम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आलेल्या लेखात शाहरुखनं ‘कधी कधी मी राजकारण्यांच्या हातची अनोळखी वस्तू बनतो. काही राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी भारतीय मुस्लिमांच्या देशद्रोहाचं आणि चुकीचं असल्याचं प्रतीक म्हणून माझा वापर करतात’असं म्हटलं होतं. आणि त्याच्या या वक्तव्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानात दिसून आले. `आऊटलूक टर्निंग पॉईंट`शी बोलताना शाहरुखनं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
`आऊटलूक मॅगझिनमधील शाहरुखच्या लेखात आक्षेपार्ह असं काही नाही मात्र, मीडियानं त्या वक्तव्यांना वेगळ्या पद्धतीनं मांडून त्यालाच अतिमहत्त्व दिल्याचं प्रियांकानं म्हटलंय. 'लोकप्रिय व्यक्तींना आपलं निशाणा बनवणं जास्त सोपं आहे' असं ती म्हणते.
जर प्रियांका चोप्राचं नाव प्रियांका 'खान' असतं तर अधिक वादाला सामोरं जावं लागलं असतं का? असा प्रश्नही तिला यावेळी विचारला गेला. याला उत्तर देताना प्रियांका म्हणते, 'मला वाटतं चोपडा या नावासहितही मी वादात अडकू शकते. या गोष्टीला विनाकारणच अतिमहत्त्व दिलं जातंय. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात असा प्रश्न विचारण्यासही तुम्हाला लाज वाटायला हवी'.
`मीडियाने या गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नये, असं प्रियांका चोप्राने म्हटलं आहे. करत असल्याचं प्रियांकाचं म्हणणं आहे. आपल्या ‘इन माई सिटी’ या म्युझिक व्हिडीओच्या लॉन्चिगच्या वेळी ती बोलत होती.