www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटसाठी गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं परदेशी कंपनीकडून तब्बल चार डझन गुलाबी चेंडूही मागविलेत. या चार डझन चेंडूंसाठी असोसिएशन ३.१२ लाख रुपये मोजणार आहे.
एस. के. आचार्य स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूंचा वापर होणार आहे. १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत चालणारा हा अंतिगम सामना प्रकाशझोतात खेळविला जाणार आहे. इडन गार्डनवर हा सामना रंगणार आहे. या स्पर्धेत बंगालचे दोन तर ओडिशा व झारखंड असे चार संघ खेळणार असून १५ सप्टेंबरपासून स्पर्धेला आरंभ होईल.
गुलाबी चेंडूंचा वापर ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमध्ये केला जातो. हा उपयोग केवळ प्रायोगिक तत्त्वावरच आहे. यासंदर्भात बंगाल क्रिकेटचे खजिनदार विश्वरूप डे म्हणाले की, प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेटची सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यात वापरता येऊ शकतील अशा गुलाबी चेंडूंचा सर्वप्रथम वापर करण्याची कल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरविणार आहोत. यासाठी खेळाडू पांढऱ्या गणवेशात असतील तर साईटस्क्रीन काळ्या रंगात असेल.
या सामन्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं ऑस्ट्रेलियातील ‘कुकाबुरा’ कंपनीकडून गुलाबी चेंडू मागविले असून चार डझन गुलाबी चेंडू वापरले जाणार आहेत. अंतिम सामन्यासाठी तयारी करण्याचा भाग म्हणून संघांना हे चेंडू दिले जातील. त्यांची किंमत अंदाजे ३.१२ लाख इतकी असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.