www.24taas.com, कोलकाता
क्युरेटर प्रबिर मुखर्जी पुन्हा कामावर रूजू झाले मात्र तत्पूर्वी हा वाद चांगलाच चिघळला होता. हा वाद तेव्हा अधिकच चिघळला जेव्हा मुखर्जी यांनी क्युरेटरपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. आपण एक महिन्याच्या सुट्टीवर जात असल्याचं त्यांनी कॅबला कळवल होत. कॅप्टन धोनीच्या म्हणण्यानुसार आपण काम करू शकत नसून टर्निंग पिच बनवणे हे अनैतिक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केल होत.
ईडन गार्डनचे ज्येष्ठ क्युरेटर प्रबिर मुखर्जी हे असतानादेखील बीसीसीआयने ईस्ट झोनचे क्युरेटर आशिष भौमिक यांच्या नियुक्तिचा मेल क्रिकेट एसोसिएशन ऑफ बंगालला केला. आणि यानंतर ईडन गार्डनचे पिच आणि क्युरेटर हा वाद चिघळला. बीसीसीआयने केवळ धोनीच्या हट्टापायी ईडन गार्डनचे ज्येष्ट क्युरेटर प्रबिर मुखर्जी असतानाही ईस्ट झोनचे क्युरेटर आशिष भौमिक यांच्या नियुक्तिचा निर्णय घेतला. यामुळे नाराज झालेल्या मुखर्जींनी सरळ एक महिन्याच्या सुट्टीवर जाणार असल्याचं जाहीर केल याचबरोबर बीसीसीआय, कॅब आणि धोनीवर चांगलच टीकास्त्र सोडलं.
(धोनीला पहिल्यादिवसापासून टर्निंग पिच पाहिजे आहे. मला वाटत हे अनैतिक आहे. तुम्ही क्रिकेटप्रेमींकडून पाच दिवसाचे पैसे घेता आणि मॅच तीन दिवसात संपते ही क्रिकेटरसिकांची लूट आहे. बोर्ड क्रिकेटपटूंना चांगले क्रिकेट खेळण्यासाठी पैसे देते त्यांनी अशी मागणी करू नये. मला याची आवड आहे म्हणून मी या वयातही हे काम करतो.)
कॅप्टन धोनीला ईडन गार्डनचं पिचदेखील स्पिनर्सला मददगार पाहिजे आहे आणि यासाठी बीसीसीआयने मुखर्जी असतानाही नव्या क्युरेटरच्या नियक्तिचा निर्णय घेतला होता. यामुळेच नाराज झालेल्या मुखर्जी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. अखेर प्रबिर मुखर्जींसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ क्युरेटरसमोर कॅबनेही नमते घेतले.
कॅबचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी प्रबिर मुखर्जी यांच्याशी चर्चा केली आणि अखेर प्रबिर मुखर्जी इंग्लंडविरूद्ध होणा-या तिस-या टेस्टसाठी आता हजर राहणार आहेत. दरम्यान वानखेडेवर टर्निंग पिचचा कॅप्टन धोनीचा हट्ट भारताला किती महागात पडला हे सा-यांनी पाहिल. आता पुन्हा एकदा जर बीसीसीआयने धोनीचा स्पिनर्स फ्रेंडली पिच बनवण्यासाठी हट्ट पूर्ण करण्यासाठी जर आटापिटा केला आणि ते तोंडघशी पडले तर धोनी आणि बीसीसीआय सा-यांच्याच निशाण्यावर येतील एवढ मात्र नक्की.