www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.
शिखर धवन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, महेंद्र सिंग धोनी यांसारखे अनुभवी बॅट्समन द.आफ्रिका दौऱ्यात सपशेल अपयशी ठरत असताना, करिअरमधील अवघी दुसरी टेस्ट खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं वाँडरर्सपाठोपाठ, डर्बन टेस्टमध्ये आपल्या कामगिरीची छाप पाडली. सातव्या पोझिशनवर बॅटिंगला येणाऱ्या रहाणेनं टेलएंडर्सना साथीला घेत टीम इंडियाला प्रत्येकवेळी संकटातून वाचवलं. द.आफ्रिकेविरूद्ध अखेरच्या टेस्टमध्ये तर तो सेंच्युरी झळकावण्याच्या उंबरठ्यावर असताना बोल्ड झाला आणि त्याचं पहिली वहिली आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावण्याचं स्वप्न भंगलं.
अजिंक्य रहाणेनं द.आफ्रिकेविरूद्ध खेळलेल्या २ टेस्टमध्ये ९६ रन्सच्या सर्वोच्च खेळीसह ६९.६६च्या सरासरीनं २०९ रन्स तडकावल्या. सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय बॅट्समन्सच्या लिस्टमध्ये तो दुसऱ्या स्थानी राहिला.
द.आफ्रिकेत दाखवलेल्या आपल्या दमदार परफॉर्मन्समुळंच न्यूझीलंड दौऱ्याकरता अजिंक्य रहाणेची वन-डे आणि टेस्ट स्क्वॉडमध्ये वर्णी लागली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रिटायरमेंटनंतर टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करणारं मुंबईचं खंबीर नेतृत्व रहाणेच्या रूपात मिळालं आहे. घरच्या मैदानावर सलग सेंच्युरी ठोकणारा रोहित शर्मा द.आफ्रिकन पीचेसवर फ्लॉप ठरला. त्याच्यात तुलनेत अगदी नवशिक्या असणाऱ्या अजिंक्यनं मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.