कोहलीवर कर्णधारपदाचं ओझं नका टाकू - अक्रम

क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याच्यावर आत्ताच कर्णधारपदाची जबाबदारी टाकू नये असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांने व्यक्त केले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 11, 2012, 04:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याच्यावर आत्ताच कर्णधारपदाची जबाबदारी टाकू नये असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांने व्यक्त केले आहे. परंतु, महेंद्रसिंग धोनीला तीनही फॉरमॅटच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करायला हवे, असेही त्याने यावेळी सांगितले.

क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्याची चर्चा होत आहे, परंतु यासाठी थोडी वाट पाहणे योग्य ठरणार आहे. तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या १८ महिन्यात भारतासाठी त्याने चांगले रन्स केले आहेत. त्याला क्रिकेट एन्जॉय करू दिले पाहिजे. यावेळी त्याच्यावर जबाबदारी टाकणे योग्य नाही. संघ निवड आणि इतर गोष्टीचा दबाव त्यावर टाकला नाही पाहिजे, असे अक्रम यांनी सांगितले.

धोनीबाबत बोलायचे झाले तर, त्याने तीन ऐवजी कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी, त्यानंतर त्याने स्वतःच्या खेळाकडे लक्ष द्यावे. टी-२० विश्व चषकाच्या सेमी फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा स्थान न मिळविल्याबद्दल टीम इंडियावर टीका होत आहे. परंतु धोनीने स्वतः याकडे लक्ष्य द्याला हवे, तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणे कितपत योग्य आहे आणि हा दबाव सहन करणे कितपत योग्य आहे. याचेही आकलन केले पाहिजे, असेही अक्रमने यावेळी सांगितले.